जगातील आदिमहाकाव्य ''श्री वाल्मिकी रामायण ''! त्या महाकाव्याचा नितांतसुंदर नायक आहे. ''श्री राम'' !! भारतीयांचा तो मुकुटमणी ठरला, वंदनीय ठरला. अशा श्रीरामाच्या `श्री राम मंदिरात ' स्थापन झाले एक वाचनालय ! हे वाचनालय म्हणजे सरस्वतीचं व विद्येचेमंदिर आहे. या वाचनालयाचं नाव '' दादर सार्वजनिक वाचनालय '' त्याचा स्थापना दिवस होता - नारळीपौर्णिमेचा ! तारीख होती - २३ ऑगस्ट १९०७. आजही दादरच्या भवानी शंकर मार्गावर हे श्रीराम मंदिर भक्तांच्या श्रध्देने मोठ्या दिमाखात उभे आहे. ग्रंथालय चळवळीला प्रेरणा व आशिर्वाद देण्यासाठी श्रीप्रभू रामचंद्र यांचा आदर्श आमच्या पुढे सदैव उभा आहे !
१९०७ साली कै. म. ग. गोरे, कै. ग. गो. माचवे, कै. श्री. म. वर्दे आणि कै. ल. र. सवाई या चार सामाजिक कार्यकर्त्यांसह आणखी ५-६ साहित्यप्रेमी व वाचनसंस्कृतीशी प्रेम असणा-यांनी ही संस्था स्थापन केली. त्या वेळचे एकूण सारे ग्रंथ एका छोटयाशा पेटीत मावले होते. ते वाचनालय वाचकांच्या आवडीमुळे वाढू लागले त्यामुळे वाचनालयाची थोड्याच कालावधीत सभासद संख्या झपाट्याने वाढून वाचनालयाची प्रगती होत गेली. आज दादर सार्वजनिक वाचनालय ( प्रचलित नाव `दा.सा.वा.' ) हे एक अग्रणी ग्रंथालयच नव्हे तर ते विद्येचे मंदिर असून ही प्रबोधन करणारी सांस्कृतिक संस्था आहे.
सन १९०७-२००७ या संस्थेच्या शतकपूर्वीच्या कालखंडात संस्थेने अनेक अन्य सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यप्रेमी संस्थांना उत्तेजन दिले आहे. शेकडो नि:स्वार्थी कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळेच या संस्थेला अग्रगण्य ग्रंथालयाचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या कार्यात सन १९५९ पासून दा. सा. वा. नेहमीच सहभागी होत आहे. !
जिल्हा स्तरावर बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संमेलनाचे दा. सा. वा. ने सन १९७९ मध्ये आयोजन केले होते. या ग्रंथालयाच्या कामकाजाची व कार्यपध्दतीची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन, संस्थेला सन १९८६-८७ चा उत्कृष्ट सार्वजनिक वाचनालयाचा '' डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार '' देऊन गौरविले आहे. तसेच २००१ साली संस्थेला मुंबई मराठी साहित्य संघाकडून '' डॉ. अ. ना. भालेराव स्मरणार्थ सेवाभावी पुरस्कार '' हा साहित्य संघाचा साहित्यसेवा गौरव सन्मान प्राप्त झाला. दा. सा. वा. च्या अनेक वर्षांच्या अविरत साहित्यसेवेचे आणि सांस्कृतिक प्रयत्नांचे फलित म्हणूनच की काय, सन १९९९ साली मुंबईत साजऱ्या झालेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याची सन्मान्य जबाबदारी दा. सा. वा. ला देण्यात आली. दा. सा. वा. ने आपल्या व्यवस्थापक मंडळ, सेवक वर्ग व इच्छुक सभासदांच्या मदतीने ह्या समारंभाचे व्यवस्थापन सुयोग्यपध्दतीने आयोजित केले. सभासद नसलेल्या परंतु साहित्यप्रेमी अशा विविध महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना देखील ह्या सोहळयात कार्यकर्ते व स्वयंसेवक म्हणून सहभागी करून दा. सा. वा. ने त्या सर्वांना एक नविन अनुभव घेण्याची संधी प्राप्त करुन दिली.
संमेलनानिमित्त दा. सा. वा. ने कै. रविंद्र पिंगे ह्यांच्या संपादनाखाली एक स्मरणिकाही प्रकाशित केली, ज्यात आतापर्यंतच्या सर्व मराठी साहित्य संमेलनांचा व संमेलनाध्यक्षांचा आढावा घेतला गेला आहे. ह्या स्मरणिकेत अनेक प्रस्थापित साहित्यिकांपासून ते नवोदित कवी-लेखकांपर्यंत सर्वांच्या प्रातिनिधिक गद्य-पद्य रचनांचा देखील सहभाग केलेला आहे. दा. सा. वा. ने संगणकाचा वापर ग्रंथालयीन कामकाजात सुरू करण्याचा निर्धार करून ऑगस्ट ९६ मध्ये प्रथम दोन संगणक खरेदी केले. त्यांचा प्रत्यक्ष कामकाजात वापर १९९६ पासून सुरू केला. ग्रंथालयातील सुमारे लाखभर पुस्तकांची नोंद संगणकात करण्यात आल्याने लेखक, नाम, सूची, ग्रंथनाम सूची, विषयांनुसार ग्रंथसूची , अनुवादकानुसार अशा प्रकारच्या अनेक सूची तयार केल्या आहेत.ग्रंथांची देवघेव ही संपूर्णपणे संगणकाच्या मार्फत स्तंभ सांकेतांक (बार कोड) पद्धतीने केली जाते. ग्रंथालय व्यवहारात स्तंभ सांकेतांक (बार कोड) पद्धती वापरणारे दासावा हे महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक ग्रंथालय आहे. आर्थिक व्यवहारासह संपूर्ण कामकाज संगणकाद्वारे व ते ही पूर्णपणे मराठीमधून करणारी दा. सा. वा. ही मराठी भाषिक ग्रंथालयांतील एक अग्रगण्य किंबहुना प्रथम क्रमांकाची संस्था आहे.साहित्यिक व वाचक यांचा दुवा साधता साधता दादर सार्वजनिक वाचनालयाने २१ व्या शतकात २००७ साली आपला '' शताब्दी महोत्सव '' गाजावाजाने साजरा केला.